Monday, February 21, 2011

गंध !.. उदबत्तिचा, औषधांचा आणि तान्हुल्या जीवाचाही...!!!

नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की, स्वारीने कालच हा सिनेमा पाहिलेला दिसतोय. 
तर गंध.. काय बरं फरक आहे वास आणि गंध यात? मला वाटते की वासाला आठवणी चिकटल्या की तो गंध होतो. 
ह्या पिक्चरचेच पाहा ना, तीन निरनिराळी  कथानके, पात्रांचे जगण्याचे मापदंडही वेगळे, तरीही या सर्वांना जोडणारा एक common धागा..अर्थात गंध !
पहिली गोष्ट एका उपवर लग्नेच्छु तरुणीची. घरचे 'लग्न कर' म्हणून मागे लागलेले , स्थळही सांगून येतायत आणि अशातच तिला भेटतो एक साधासा तरुण  ज्याच्या शरीरगंधावर ती मोहित होते. पुढे त्याचा पाठलाग करत असताना तिला कळते की तो रात्री एका उदबत्त्या बनविण्याच्या कारखान्यात काम करत असतो. नंतर काय होते हे सुज्ञास  सांगणे न लगे... पण तरीही.. या कथेचा सुखांत होतो!!  खरेतर ही कथा फार वेगळी नाही. काही वेळा तर  अमृता सुभाषच्या थोड्याश्या नाटकी अभिनयाचा वैतागही येतो. तरीपण कथेची मांडणी, camera ने पकडलेल्या ओळखीच्या तरीही वेगळ्या अशा पुण्यातल्या गल्ल्या आणि गिरीश कुलकर्णीचा संयत अभिनय या गोष्टी आपल्याला नक्कीच खिळवून ठेवतात. 
          माझ्यामते तरी हा सिनेमा  उरलेल्या दोन कथांमध्ये जबरदस्त पकड घेतो. एक गोष्ट म्हणजे 'औषध घेणारा माणूस' आणि दुसरी ' बाजूला बसलेली बाई'. त्यापैकी 'औषध घेणारा माणूस' ही गोष्ट आहे एका 'HIV positive ' माणसाची ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे व काही काळाने त्याला परत भेटायला आली आहे. त्या दोघानमधिल अजूनही शिल्लक असलेल्या प्रेमाचे रंग सोनाली कुलकर्णी व मिलिंद सोमण यांनी अतिशय हळुवारपणे साकारले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाबद्दल प्रश्नच नाही पण मिलिंद सोमण हा ही किती गुणी कलाकार आहे हे वेळोवेळी  जाणवते. खास उल्लेख करायला हवा तो त्याच्या शुद्ध मराठी उच्चारांचा.. [ हो कारण बरीचशी मराठी models , मराठी अगदी नवीन शिकत असल्यासारखे बोलतात.] 
                   हा 'HIV positive ' माणूस फक्त औषधांवर जगतोय, पण त्याची पत्नी त्याला ज्यावेळी सोडून गेली त्या क्षणापासून त्याने ते घर जसे च्या तसे ठेवले आहे.. तिची आठवण म्हणून! ती खूप दिवसांनी घरी येणार ह्याची तो खूप आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने मनात अगणित योजना तयार केल्या आहेत. खास तिच्या आवडीचा स्वयंपाक करून घेतला आहे. पण तिला मात्र आल्यापासून कसला तरी सडलेला दर्प येतो आहे घरात आणि मग हळूहळू त्या दोघांना (आणि आपल्यालाही) असे जाणवते की हा माणूस वास घ्यायची शक्तीच गमावून बसलाय. अगदी कांदा किंवा लिंबू अशासारखे तीव्र वासही त्याला जाणवत नाहीत. मग शेवटचा उपाय म्हणून तो gas चे  बटण  लावतो व बर्नर च्या अगदी जवळ जाऊन तो वास घ्यायचा प्रयत्न करतो... कितीतरी वेळ... याचा शेवट दिग्दर्शकाने जसा काही तुमच्यावर सोडला आहे...अगदी कालवाकालव होते त्यावेळी... 
         तिसरी गोष्ट आहे तळकोकणातल्या अशा एका घराची ज्यामध्ये एक माहेरवाशीण बाळंत होत आहे आणि त्या घरातील कर्ती बाई 'बाजूला' बसली आहे. तिचा नवरा बाहेरगावी गेला आहे. या सगळ्या वातावरणाला पार्श्वभूमी आहे ती मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेची. एकीकडे या बाईची सासू मुलीचे बाळंतपण पार पाडताना मेटाकुटीला आली आहे तर दुसरीकडे या 'बाजूला' बसलेल्या बाईचीही तगमग होत आहे... दोन कारणांमुळे, एक म्हणजे घरातील घडामोडी व दुसरे म्हणजे तिची स्वतःची कूस अजून रिकामीच आहे.. या सर्व काळामध्ये तिचा एकमेव आधार म्हणजे तिचा भाचा राघव! या दोघांमधील संवाद, त्याच्यामधील राघूचा निरागसपणा, नीना कुलकर्णीच्या डोळ्यामधील भाव [हो, सांगायचे राहिलेच, ही बाजूला बसलेली बाई  नीना कुलकर्णीने रंगवली आहे .]  यातील काहीही miss करून चालणार नाही. शेवटी चौथा दिवस उजाडल्यानंतर कसेबसे सर्व आवरून ही बाई जेव्हा त्या बाळाला हृदयाशी धरून त्याच्या जावळाचा, त्याच्या अंगाचा श्वास भरून गंध घेते तेव्हाची तिची भावमुद्रा आपल्या मनात कायमचे घर करते. 
      ही गोष्ट घडत असताना दिग्दर्शकाने (किंवा कैमेरामन ने म्हणूया हवे तर) तळकोकणाचे असे काही भुलवणारे रूप दाखवले आहे की निव्वळ त्याच्यासाठी ह्या सिनेमाला १०० पैकी २०० मार्क्स द्यावेत. एडिटिंग ची सुद्धा हीच गोष्ट आहे... 
एकूण काय, सचिन कुंडलकर यानी त्यांच्या ठेवणीतून पेश केलेल्या या अत्तराच्या कुपीचा गंध आपल्या मनात दीर्घकाळ रुंजी घालतो हे नक्की...!!

          

Monday, February 14, 2011

Happy Valentines Day.. To all human beings!!


प्रेम..नुसत्या उच्चारानिशी अंगावर रोमांच फुलवणारा जादुई शब्द ! 
व्यक्ती बदलली की प्रेमाचे संदर्भही बदलतात. कोणासाठी मातृप्रेम  हे सर्वश्रेष्ठ तर कोणासाठी देशप्रेम . कोणाला सत्तेचे प्रेम आंधळे  बनवते तर कोणाला पैशाचे प्रेम... कोणी दर दिवसाला बदलणारी गर्लफ्रेंड हीच प्रेमाचीअभिव्यक्ती मानतो तर दुसरीकडे 'जिच्यावर मनापासून प्रेम केले अश्या प्रेमिकेचा दुर्दैवी अंत झाल्यावर तिच्या आठवणीवर  उरलेले आयुष्य काढणारा प्रेमिकही आपल्याला भेटतो. पण एक मात्र नक्की, आपण सगळे  'प्रेम' या संकल्पनेवरच  मनापासून प्रेम करत असतो.
त्यातून आज तर काय, जगभरातील 'प्रियकर-प्रेयसीला' त्यांच्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करायचे license  देणारा दिवस.. जिकडे पाहावे तिकडे कसे गुलाबी वातावरण तयार झाले आहे. सगळ्या सार्वजनिक बागा आणि जागा  तरुणाईने  भरून आणि बहरून गेल्या आहेत. ' I LOVE YOU'  किंवा 'मी तुझी साथ जन्मभर सोडणार नाही' अशा आणाभाका चोहिकडे ऐकू येत आहेत. (त्यातल्या किती निभावल्या जातात त्याचे संशोधन करायला वेळ कुणाला आहे इकडे? ).  बरयाच विवाहोत्सुक जोड्यांनी लग्नबंधनात अडकण्यासाठी आजचाच पवित्र(?) मुहूर्त निवडलाय. dinner ला कोठे जायचे, आपल्या प्रिय व्यक्तीला भेट काय द्यायची, याचे प्लॅनिंग अगोदरच झाले आहे. एखाद्याच्या मनात जर गिफ्ट विषयी confusion असेलच चुकून, तर मोठमोठे shops आहेत की सज्ज तुमची ही छोटीशी समस्या दूर करायला.. हा खिसा तेवढा जड़ असला की झाले..  
वरील सर्व वाचून 'हिला प्रेमाची allergy आहे का ' असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविकच आहे. पण खरं सांगू का, मला allergy ही प्रेमाविषयी नसून प्रेम साजरे करण्याच्या प्रकाराबद्दल आहे. इतक्या हळुवार, नाजूक भावनेचे जाहीर प्रदर्शन करण्याची खरोखरीच किती गरज आहे? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यापर्यंत ही भावना पोचली की पुरेसे नाही का? आणि गिफ्ट चे म्हणाल तर तुमचे शाश्वत प्रेम हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे गिफ्ट नाही का? म्हणजे काहीच गिफ्ट देऊ नका असे नाही.. पण केवळ  त्याच्या  किमतीवरून तुमच्या प्रेमाची खोली नाही ना मोजली जाऊ शकत...तेव्हा गिफ्ट देताना त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार सर्वात आधी..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'partner' खेरीज इतरही माणसे आहेत हो आपल्या जीवाभावाचीज्यांनी स्वतःच्या असंख्य इच्छा-आकांक्षा बाजूला सारून तुम्हाला परिस्थितीची जाणीव न करू देता वाढवले ते आई-बाबा,ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःला मिळालेल्या chocolate चा अर्धा तुकडा राखून ठेवला ती तुमची भावंडे, ज्यांनी तुम्हाला कठीण प्रसंगात साथ दिली ते तुमचे शेजारी, तुम्हाला शिकवलेले शिक्षक.. फार गरज आहे हो यासगळ्यांना तुमच्या प्रेमाची.... तुम्ही ते करत नसाल असे नाही, पण त्याची कबुली त्या व्यक्तीकडे देऊन तर बघा. त्यांच्या डोळ्यातील अश्रू खूप काही देऊन जातील तुम्हाला.. आपले आयुष्य ज्यांनी ज्यांनी सुंदर केले त्यांनाआपण बाकी काही देऊ शकत नसलो तरी त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी, कृतदन्यता व्यक्त करण्यासाठी या दिवसासारखा दुसरा दिवस नाही असे मला तरी वाटते. 
तेव्हा तुम्हा सर्वांना मनापासून 'Happy Valentines Day....!!!'

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...